70 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यी, कोरबेवॅक्स लस उपलब्ध
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
आरोग्य विभागाकडून 12 ते 14 वयोगटांतील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणार्या मुलांसाठी 21 मार्चपासून कोव्हिड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात 70 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना ही लस देणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. कोव्हिड लसीकरणाचा आठवा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या टप्प्यात 12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे लसीकरण केले जाईल. आत्तापर्यंतच्या सात टप्प्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनची लस वापरली आहे.
मुलांसाठी कोरबेवॅक्स लस उपलब्ध झाली आहे. या लशीच्या एका व्हायलमध्ये (बाटली) 20 डोस आहेत. एका इंजेक्शनमधून 0.5 मिली इतका डोस दिला जाईल. कोव्हॅक्सिनप्रमाणेच कोरबेवॅक्स लशीचे दोन डोसमधील अंतर चार आठवडे राहील. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ही लस देऊन या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसरा टप्पा फ्रंटलाईन वर्कर, तिसरा टप्पा 45 वयोगटावरील सहव्याधी व 60 वयोगटासाठी घेण्यात आला. 45 वयोगटावरील सर्व नागरिकांसाठी चौथा टप्पा, 18 ते 44 वयोगटासाठी पाचवा, 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना सहाव्या टप्प्यात आणि 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सातवा टप्पा घेण्यात आला. आठव्या टप्प्यात जिल्ह्यासाठी 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी 20 हजार 400 डोस उपलब्ध झाले आहेत. मुलांचे लसीकरण करून घ्या, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोव्हिड लसीकरणाची पहिल्या डोसची मात्रा 10 लाख 53 हजार 729 देण्यात आली असून हे प्रमाण 97. 40 टक्के आहे. दुसर्या डोसची मात्रा 8 लाख 78 हजार 20 असून हे प्रमाण 81.16 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 19 लाख 31 हजार 749 लशीच्या मात्रा देऊन नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित केले आहे. 2007 वा त्यापूर्वी जन्मवर्ष असलेले पात्र (15 ते 18 वर्षे वयोगटातील) पहिल्या डोसची मात्रा 49 हजार 347 लशीच्या मात्रा दिल्या असून ते प्रमाण 68.78 टक्के आणि दुसर्या डोसची मात्रा 34 हजार 631 असून हे प्रमाण 48.27 टक्के आहे.
रत्नागिरीत 12 ते 14 वयोगटातील लसीकरण
