। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्याची लोकसंख्या 59,914 असून तालुक्याची आरोग्य व्यवस्था म्हसळा शहरातील एक ग्रामिण रुग्णालय आणि तालुक्यातील म्हसळा, मेंदडी, खामगांव येथील 3 प्रा.आ.केंद्र याच्यावर विसंबून आहे.त्यांच्याच माध्यमातून तालुक्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. दि.23 डिसेंबर कोव्हिड 19 च्या प्राप्त अहवालानुसार म्हसळा तालुक्यातील 33049 नागरीकांनी पाहिला डोस तर 20732 नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे. याची टक्केवारी पहाता पहिला डोस 62 टक्के नागरीकांनी घेतला तर दुसर्या डोसकडे 60 टक्के नागरीकानी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील ग्रामिण भागातील 23 हजार 814 नागरीकांनी पहिला डोस तर शहरातील 9235 नागरीकांनी पहिला डोस घेतल्याचे अहवालात म्हटले आहे. पहिल्या डोसचे सरासरी प्रमाण 62 टक्के व दुसर्या डोसचे सरासरी प्रमाण 40 टक्के आहे. यानिमित्ताने लसीकरण संथ गतीने सुरू असल्याचे समोर येत आहे. कोरोना व्हायरसअद्याप पूर्णतः गेला नाही. काही देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. तरी लसीकरण केंद्रांवर आता पूर्वीसारखी गर्दी नसते. ग्रामीण भागातील दुर्गम गांव- वाड्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकर- णाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे.