संपूर्ण चेरफळवाडीवर झाले लसीकरण

जनजागृतीनंतर सर्व ग्रामस्थांनी घेतली कोव्हिड लस
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातोय. जंगलात, डोंगर, दर्‍या खोर्‍यात रानावनात राहणार्‍या आदिवासी बांधवात कोव्हिड रुग्णांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लसीकरणाबाबत आदिवासी बांधवांमध्ये उदासीनता दिसून येत होती. मात्र प्रबोधन, जनजागृती नंतर सुधागड तालुक्यातील चेरफळवाडी आदिवासीवाडीवरील 18 वर्षावरील सर्व ग्रामस्थांनी एकाचवेळी कोव्हिड लसीचा डोस घेऊन अनोख्या प्रकारे जनजागृती केली आहे.
यावेळी तब्बल 180 ग्रामस्थांनी लस घेतली. कोविड लसीकरणाबाबत आदिवासी समाजामध्ये काही प्रमाणात भीतीचे व उदासीनतेचे वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जण लस घेण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. मात्र आता गावोगावी जाऊन प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी नेते यांच्या सहभागाने आदिवासींचे मनपरिवर्तन झाले आहे, त्यामुळे लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी सांगितले.
पाली तहसीलदार रायन्नावार यांच्या पुढाकाराने, गटविकास अधिकारी विजय यादव व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांच्या प्रयत्नांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी वाडीवर कोव्हिड लसीकरण होऊ शकले. येथील ग्रामस्त शिक्षक राजू बांगारे यांनी सांगितले की, आदिवासी समाजात प्रामुख्याने कातकरी व ठाकूर समाजात कोव्हिड लसीकरणाबाबत अनेक गैरसमज व भीती आहे. परिणामी आदिवासी बांधव लसीकरणाकडे पाठ फिरवीत आहेत. त्यामुळे चेरफळवाडी आदिवासी वाडीवरील सर्वच ग्रामस्थांनी एकाचवेळी कोव्हिड लस घेऊन लसीकरण सुरक्षित असल्याचे व कोरोनापासून बचाव होण्यासाठी ते सर्वांनी घेतलेच पाहिजे हा संदेश देऊन जनजागृती केली आहे.

आदिवासी बांधवांनी चेरफळवाडीचा आदर्श घेऊन कोव्हिड लसीकरणासाठी पुढे यावे. सुरुवातीस बर्‍याच ठिकाणी आदिवासी बांधव लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. मात्र आता सकारात्मक बदल घडत आहे.
दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

आदिवासी बांधव आता लस घेण्यासाठी सकारात्मक मानसिकतेत आहेत. सर्वांनी अतिशय शांततेत, शिस्तीत व नियमांचे पालन करून कोव्हिड लस घेतली. आदिवासी ग्रामस्थांनी लसीकरणासाठी पुढाकार घेऊन चांगले सहकार्य केले.
डॉ. दिपाली देशमुख, लसीकरण पथक प्रमथळ

Exit mobile version