वडगाव शाळेचे डिजिटल पाऊल

ग्रामीण विद्यार्थ्यांना जगाशी जोडले; डॉ. संगीता तोडमल यांचे मार्गदर्शन

| रसायनी | प्रतिनिधी |

माणिकगडाच्या पायथ्याशी डोंगरात वसलेल्या आदिवासी वस्ती असलेल्या वडगाव गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डिजिटल दूरस्थ गुगल मीटच्या माध्यमातून अमेरिकेतील पर्यावरण तज्ज्ञ डॉ.संगीता तोडमल यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. तोडमल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यामुळे वडगाव शाळेच्या एका डिजिटल पावलामुळे ग्रामीण विद्यार्थी जगाशी जोडले गेले.

वडगाव जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.17) गुगल मिटच्या माध्यमातून अमेरिकेतील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. संगीता तोडमल यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. तोडमल यांनी भारतीय व अमेरिकीन या दोन ध्रुवाच्या टोकाच्या देशातील वर्तमान वेळ, तेथील वातावरण, हवामान, घरांची रचना, वनस्पती, प्राणी यांच्यातील साम्य व फरक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करत संवाद साधत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील प्रश्न विचारून आपली जिज्ञासा दाखवली. तेथील सण उत्सव, पर्यावरण धोरण, प्राणी, शेती व घरांविषयी प्रश्न विचारून उत्तरे मिळवत चर्चेत सहभाग नोंदवला. तसेच, तेथील शिक्षण व प्रशासन पद्धतीविषयी मार्गदर्शन करताना शाळा, संरचना, अभ्यासक्रम, वेळापत्रक व विशेष म्हणजे गणवेश नसणे आणि थेट कौंटीच्या मेयरकडूनच प्रवेश दिले जातात, हे विद्यार्थ्यांना विशेष वाटले. या सत्रात पर्यावरण व पर्यावरणपूरक सण उत्सव याविषयी जास्तीतजास्त मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.संगीता तोडमल यांना, सण हे आपली परंपरा व संस्कृतीचा भाग आहेत. तो वारसा आपण सर्वांनी कुठेही जगाच्या पाठीवर असलो तरी जपला पाहिजे. महू या ठिकाणी सगळे सण भारतीय पद्धतीने साजरे करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच, शाळेचे डिजिटल पाऊल पाहून डॉ.संगीता तोडमल यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष राजश्री जांभुळकर, सदस्य, पालक व विद्यार्थी यांच्यासह वैजनाथ जाधव, मयुरी धायगुडे व संकेत काठोळे हे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी केले. तर, स्वागत राजश्री जांभुळकर यांनी व आभार मयुरी धायगुडे यांनी मानले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कस्तुरी जाधव हिने या सत्राचे संचालन व नेतृत्त्व केले.

दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास प्रत्यक्ष आभासी पद्धतीने करणे हा मुलांना वर्ल्डव्हाइल्ड विचार करण्यास पूरक असा उपक्रम आहे.

– डॉ. संगीता तोडमल, पर्यावरण तज्ज्ञ, जॉर्जिया-अमेरिका

दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत ‌‘एक डिजिटल पाऊल ग्रामीण विद्यार्थ्यांना जगाशी जोडण्याचे‌’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत बसून जगाचा अभ्यास व सहल करता येईल. आज डॉ. संगीता तोडमल यांनी खूप छान मार्गदर्शन करत पहिल्या पुष्पाची सुरुवात केली. पुढच्यावेळी नवीन देशांसह पुन्हा हे सत्र आयोजित केले जाईल.

– सुभाष राठोड, मुख्याध्यापक, वडगाव शाळा

Exit mobile version