| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
युवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी, सध्या भारत ‘अ’ संघाकडून मैदान गाजवत आहे. भारताच्या आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी वैभवची निवड झाली आहे आणि त्यामुळे सीनियर संघाकडून त्याच्या पदार्पणाची सर्वांना प्रतीक्षा आहे. पण, वैभवचे पदार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या नागरी अशांततेमुळे भारताच्या आगामी आयर्लंड दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे ही मालिका रद्द होण्याची चर्चा सुरू आहे.
आयर्लंड येथे या महिन्याच्या अखेरीस दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका आयोजित होणार आहे. पण, नागरी अशांततेमुळे या मालिकेवर संकट निर्माण झाले आहे. शहरात झालेल्या एका क्रूर चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर, गेल्या काही दिवसांत बेलफास्टमध्ये तीव्र नागरी अशांतता आणि स्थलांतरितांविरोधी हिंसक दंगली उसळल्या आहेत. या गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाला असून, सार्वजनिक सुरक्षेबद्दलची चिंता वाढली आहे. क्रिकेट आयर्लंड सर्व उपलब्ध पर्यायांचा आढावा घेत आहे. सुरक्षेची चिंता कायम राहिल्यास सामने बेलफास्टहून डब्लिनला हलवण्याचा एक पर्याय विचाराधीन आहे. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ही मालिका रद्द झाल्यास वैभवचे पदार्पण लांबणीवर पडू शकते.
वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर
