नागोठणे बाजारात वालाच्या शेंगा दाखल

| सुकेळी | प्रतिनिधी |

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्यावरून बाजारात वालाच्या शेंगा येण्यास सुरुवात झाली असून, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये खवय्यांना पोपटीची चाहूल लागली आहे. त्यामुळे सर्वत्र यावर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्यांना सुरूवात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सध्या नागोठणे बाजारात वालाच्या शेगांची आवक ही मोठ्या प्रमाणात असून, खरेदीसाठी खवय्यांची झुंबड उडाली आहे. या शेगांना किलोमागे 80 ते 100 रु. दर आकारला जात आहे. उशीरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यासाठी काही महिने लागणार असून, सद्यपरिस्थितीत पोपटी शौकीनां बाजारात मिळणाऱ्या वालाच्या शेंगाना महत्त्वपूर्ण प्राधान्य दिले आहे. दरम्यान जिल्ह्यात मातीत पिकविल्या जाणाऱ्या चवदार टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र, यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि सध्या जिल्ह्यातील वालाच्या शेंगा तयार नसल्यामुळे पुण्यावरून आलेल्या शेंगावर सध्या समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी अनेकजण गुळाबी थंडीच्या दिवसांत खमखमीत पोपटीचा आस्वाद घेतानाचे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version