…अन् चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची लगबग!
। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस पडून नाल्यांची पात्र दुथडी भरून नदीकडे वाहू लागली असून अनेक गावांमध्ये या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्या माशांची वलगन लागली आहे. ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांनी ही वलगनीची गोड्या पाण्याची मासळी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे सुसज्जता ठेवली आहे. मासेखाऊंची चढणीचे म्हणजेच वलगनीचे मासे पकडून मुसळधार पावसाची अनोखी मजा साजरी करण्यासाठी लगबग सुरू आहे.
पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, चोळई आणि ढवळी या पाच प्रमुख नद्यांची पात्रं अद्याप पुरेसा पाऊस न पडल्याने उथळच दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नाल्यांची पात्रं दुथडी भरल्यानंतर नदीकडे येणार्या ओहोळातून तसेच शेतीच्या पाण्याच्या पाटातून विरूध्द दिशेने शेताकडे जाऊन उथळ व संथ पाण्यात अंडी अथवा पिले सोडणार्या माशांनी अंडी सोडण्यासाठी उलटा प्रवास करण्यास वलगन असे गावाकडे म्हणतात. खेडेगावांतील ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांनी ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी पागविणे, बांधणं घालणे, खोचेरे मारणे आणि जाळयात पकडण्याचे विविध मार्ग अवलंबिले आहेत. तालुक्यातील प्रदुषणरहित गोड्या पाण्यातील वांब, सकला, कटला, मुरगी, अहिर, खडशी, भिंग, मळयाचे मासे, शिंगटया, टोलकी, डाकू मासा, शिवड्याचे पातं असे मासे तसेच किरवी किंवा मुरी, मुठे (पांढरी खेकडी), झिंगे, चिंबोरी (लाल खेकडी)हे अष्टपाद उभयचर मांसाहारी खवैय्यांच्या जीभेवर वेगळीच अवीट चव रेंगाळत ठेवत असल्याने परगावी राहणार्या पोलादपूरकरांना त्यांच्या ग्रामीण जीवनाच्या आठवणीच्या काळातील वलगनीचे विशेष वाटत असते.
मळयाचे मासे मुंबईकर चाकरमान्यांना एसटी बसेस तसेच खासगी प्रवासी गाडयांमधून तळून डब्यांतून पाठविली जात असून बस मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हे डबे घेण्यासाठी चाकरमानी मुंबईतील संबंधित स्थानकावर अथवा थांब्यावर वाट पाहात असतात. महाड व पोलादपूर तालुक्यातील मत्स्यप्रेमी खवय्ये आवर्जून कापडे बुद्रुकच्या नरवीर तानाजी मालुसरे कमानीखाली बसलेल्या आदिवासी महिलांकडून अव्वाच्या सव्वा दर मोजून वेगवेगळया प्रकारचे मासे खरेदी करताना दिसत आहेत.