माथेरानचे व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार?

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये पर्यटकांचे आकर्षण असलेल्या व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ सुरू करण्यासाठी सर्व नियम, अटी, शर्थींना अधीन राहून परवानगी मिळावी यासाठी माथेरान शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या पुढाकाराने, येथील स्थानिक तरुणांचा हिरावलेला व्यवसाय त्यांना पुन्हा परत मिळावा याकरिता त्यांना एकत्रित घेऊन आ. महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले.

माथेरानमध्ये पर्यटन हा एकमेव व्यवसाय असल्याने आणि येथे दुसरे कोणतेही अन्य साधन नसल्याने येथे येणार्‍या पर्यटकांसाठी जंगल भागात दोन डोंगर किंवा तलावाच्या दोन बाजू यांना झिप लाईन म्हणजे व्हॅली क्रॉसिंगद्वारे जोडण्याचा व्यवसाय केला जात होता. या साहसी खेळांना पर्यटकांचादेखील चांगला प्रतिसाद येथे मिळत होता. परंतु, वनविभागाच्या जमिनीवर वसलेल्या माथेरानमध्ये सुरू असलेल्या साहसी खेळांना कोणतीही परवानगी नसल्याने या जंगल भागात विविध ठिकाणी लावण्यात आलेले रोप (दोरखंड) वनविभागाने तोडून टाकले होते. त्यामुळे हा व्यवसाय बंद पडला आणि येथील अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहचे साधन बंद झाले. परंतु, आत्ता माथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांना पर्यटनाबरोबर साहसी खेळ आणि व्हॅली क्रॉसिंगचा आनंददेखील घेता यावा यासाठी आणि येथील स्थानिक तरुणांचा व्यवसायदेखील पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा यासाठी चंद्रकांत चौधरी यांच्या पुढाकाराने येथील स्थानिक तरुणांनी आ. महेंद्र थोरवे यांना लेखी निवेदन सादर केले.

Exit mobile version