वांगणी पाषाणे पुल धोकादायक

नवीन पुल उद्घाटन अभावी प्रतीक्षेत

। नेरळ । प्रतिनिधी ।

पाषाणे वांगणी येथील उल्हास नदीवर एक जुना पुल आहे. या पुलावर भगदाड पडले असून तो अत्यंत नाजूक स्थितीत आहे. तरीदेखील या जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच आहे. दरम्यान, या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आला आहे. परंतु, पुलाच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा व काही राजकारण्यांनी पुलाचे उद्घाटन न झाल्यामुळे हा नवीन पुल बंद करून ठेवला आहे. यामुळे जुन्या पुलावरून धोका पत्करून वाहतूक करावी लागत आहे.

ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्याला जोडणार्‍या वांगणी पाषाणे येथील उल्हास नदीवर एक जूना पूल आहे. त्याच्याच बाजूला नवीन पुलाची बांधणी करण्यात आली असून या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भराव जुलै महिन्यातल्या मुसळधार पावसामध्ये खचला होता. उद्घाटनापूर्वीच या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर खडी आणि कच्चामाल टाकून पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद केली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाने पुलाच्या ठेकेदाराला या कामाबाबत असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नोटिसीला ठेकेदाराने केराची टोपली दाखवली आहे. या पुलाच्या कामांमध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी कोणतेही काम केले गेले नाही. सध्या या पुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.

नविन पुलाच्या दोन्ही बाजू कडील रस्ता खचलेला असताना ठेकेदाराकडून आणि सार्वजनीक बांधकाम विभागाकडून कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. असे असताना नवीन पुलावरील वाहतूक देखील जीवघेणे ठरू शकते. तरी देखील ठेकेदाराचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आहे. तसेच, राजकारणी मंडळींना या नविन बांधलेल्या पुलाचा उद्घाटन सोहळा करायचा असल्यामुळे पुलावरून अधिकृतपणे वाहतूक सुरू केली जात. परिणामी जुन्या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या खचलेल्या रस्त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये यासाठी ठेकेदाराला पाठीशी न घालता सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथील नागरीक व प्रवाशांकडून बोलले जात आहे.

Exit mobile version