प्रमोद जाधव यांना वनमित्र पुरस्कार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुळचे अलिबाग तालुक्यातील चरी येथील रहिवासी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समाजकल्याण उपायुक्त प्रमोद जाधव यांना पुणे येथील वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे डॉ. वा. द. वर्तक वनमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमोद जाधव यांच्या वनस्पती क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्याच्या धन्वंतरी हॉलमध्ये हा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील मान्यवर आयुर्वेद तज्ज्ञ व अभ्यासक उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमोद जाधव यांच्यासह राज्यभरातील 12 वैद्यांनाही विविध पुरस्काराने सन्मानित केले गेले. या कार्यक्रमात पुरस्कार वितरणाबरोबरच सन्मानार्थींच्या कार्याचा गौरव करणारी स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली. शासकीय अधिकारी पदावर कार्यरत असतानाच प्रमोद जाधव यांनी आयुर्वेद क्षेत्राला पोषक असे काम सुरूच ठेवले. जाधव यांनी लाल भाताचे 32 प्रकार त्यांचा शोध, जतन व संवर्धन तसेच लाल भातातील औषधी गुणधर्म यावर लेखन केले आहे. गेल्यावर्षी झालेल्या विश्‍वनाथ परिषदेत त्यांनी सादर केलेल्या कोकणातील भातपिकांवरील जैववैविध्य व संवर्धन या शोधनिबंधाला ब्राँझपदक मिळाले आहे. 56 पारंपारीक बियाणे, 10 जंगली झाडे, 6 क्षार सहनशील झाडे, 42 फळझाडे, 7 औषधी वनस्पती अशा 121 दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचे संवर्धन केले आहे.

Exit mobile version