रस्ता रूंदीकरण व संरक्षक भिंतीचे काम प्रगतीपथावर
। वरंध । वार्ताहर ।
महाड-वरंध-भोर मार्गे पुणे या मार्गावर सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्ता रुंदीकरणाची व संरक्षक भिंत बांधण्याची कामे प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट करून या मार्गावरील सर्व प्रकारचे वाहतूक (दि.1) एप्रिलपासून (दि.31) मे पर्यंत बंद ठेवण्यात यावी असे आदेश रायगडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेश शिर्के यांनी दिले आहेत. या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वरंध घाटातील अने कामे प्रस्तावित असून रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता, सुरक्षा उपाय करण्याची कामे प्रगतीपथावर असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत वरंधगाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षण भिंतीचे काम प्रगतीत असून बहुतांश काम पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र साखळी क्रमांक 94 पारमाची वाडी ते 96 (रायगड जिल्हा हद्द) या अंतरामध्ये कामे सुरू करावयाची असल्याने सदरच्या अंतरामध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या अंतरामध्ये चालू वाहतुकीत काम करताना अपघात होण्याची शक्यता असल्याचे नमूद करून सदरची कामे पावसाळ्यापूर्वी या स्थितीमध्ये होणे शक्य नसल्याने एक एप्रिल ते 30 मे पर्यंत वरंधगाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक पूर्णपणे बंद करावी अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आली होती. त्याच्या आधारे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेश शिर्के यांनी हा आदेश निर्गमित केला आहे.