दोन महिने वरंध घाट बंद

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केले जारी

| रायगड | खास प्रतिनिधी |

रस्त्याची सुरु असणारी कामे, तसेच पावसाळ्यात नद्यांना येणारे महापूर तसेच दरडी पडण्याच्या संभाव्य धोक्यामुळे वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 7 जुलै 23 ते 30 सप्टेंबर 23 अशा दोन महिन्यांसाठी हा मार्ग बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा दिला जाईल तेव्हा देखील वरंध घाट हा सर्वच वाहतुकींसाठी बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. वाहतुकीसाठी हा मार्ग बंद असताना पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, निजापूर, ताम्हिणी घाट, मुळशी-पिंगरुट-पुणे असा वळवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड, चिपळून, पाटण, कराड- कोल्हापूर या मार्गाने वाहतुक वळवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

सद्यस्थितीमध्ये वरंध घाटाची तात्पुरती डागडुजी करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरु आहे. या मार्गाची कायम स्वरुपी दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक परिवहन मंत्रालयाच्या वार्षिक योजने अंतर्गत सुमारे 135 कोटी रुपये खर्चाची काँक्रीटीकरणाची, घाटामध्ये डांबरीकरणाची, संरक्षण भिंती बांधण्याची तसेच अन्य आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. सदर कामासाठी मे पी.डी. इन्फ्रा.प्रा.ली. पनवेल यांची केंद्र सरकारमार्फत नियुक्ती करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत कामे सुरु आहेत.यासाठी वरंध घाट बंद करणे गरजेचे आहे. तसेच कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तसेच 2021-22 या कालावधीत जिल्ह्यात चांगलाच हाहाकार उडाला होता. महापूराची परिस्थिती पाहता पावसाळ्यात वरंध घाट हा अवजड वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे असल्यावर प्रशासनाच्या विविध विभागाचे एकमत झाले आहे. दरम्यान, या वर्षी वरंध घाटामध्ये कमी प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत, तर आंबेनळी घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडून वाहतुक ठप्प झाली होती. या ठिकाणी सातत्याने आता दरडी पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. उलट वरंध घाटात कमी प्रमाणात दरडी पडल्या, तरी हा मार्ग बंद केला आहे. वाहतुकीसाठी हे दोन्ही घाट बंद करण्याचा निर्णय झाल्यास ताम्हिणी घाटा हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो.

Exit mobile version