| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डीडीवरील राजेवाडी ते वरंध हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाच्या हाय अलर्ट इशाऱ्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महाड विभाग यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. रस्ता आता पुन्हा सुरु करण्यात येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.“अतिवृष्टीचा इशारा असलेल्या दिवसांत वरंध घाट रस्ता पूर्णतः बंद ठेवला जाईल. अशा वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवावा,” असे निर्देशही देण्यात आले आहेत.







