वरवणे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा

। अलिबाग । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील वरवणे येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शनिवारी (दि.15) शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी शशीकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला दिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

यावेळी हेटवणे जलसंपदा वसाहतीतील वरवणे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयपाल पाटील हे होते. तसेच, आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी दिनेश वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास पवार, लक्ष्मण निरगुडे, सदस्य, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांनी शाळेत राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रम तसेच शासनामार्फत विद्यार्थ्यांना मिळणार्‍या सोयी सुविधांबद्दल माहिती सांगितली. यावेळी नवागतांच्या स्वागतासाठी फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या होत्या. त्या पाकळ्यांवरुन विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करविण्यात आला. तसेच, शाळेत प्रवेशावेळी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नवागतांच्या हातात फुगे देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. शाळा फुगे व फुले यांनी सजविण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

Exit mobile version