मतदान वाढविण्यासाठी विविध उपक्रम

| नागोठणे | वार्ताहर |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र विविध प्रकारे मतदान विषयक जनजागृती सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील नागोठणे विभागातील आदिवासी वाड्यांवर मागील लोकसभा व विधानसभा निवडणूकीत 15 टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे, त्या आदिवासी वाड्यांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवून मतदान विषयक जनजागृती मोहिम राबविण्यात आली. रायगड लोकसभा मतदार संघातील 191-पेण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार तसेच, रोहाचे तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, रोहाच्या निवडणूक नायब तहसीलदार उज्वला अंधेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान जनजागृती मोहिम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आली.

नागोठणे विभागातील कोंडगाव आदिवासी वाडी, पिगोंडे व तामसोली आदिवासी वाडीसह इतर आदिवासी वाड्यांत राबविण्यात आलेल्या या मतदान जनजागृती उपक्रमात शाळकरी मुलांची प्रभातफेरी, स्पर्धा, पथनाट्य, ईव्हीएम पॅड व्हिकल डेमो दाखविण्यात आले. या मतदानविषयक जनजागृती उपक्रमात शाळकरी मुलांचे पालक, त्यांचे नातेवाईक, मुले, मुली, वयस्कर नागरिक, अपंग बांधव सहभागी झाले होते.

Exit mobile version