मोरा स्कूलमध्ये विविध स्पर्धा

| पनवेल | वार्ताहर |

उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल मोरा येथे दोन दिवस स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शासनमान्य शाळांचे स्पर्धात्मक कार्यक्रम 3 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून घेण्यात येतील. ज्यामध्ये कूट प्रश्‍नमंजुषा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, विज्ञान परिसंवाद, प्रतिकृती मूल्यांकन अशा स्पर्धा घेण्यात येतील. 4 जानेवारी सकाळी 10.00 वाजता एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मोरा या शाळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे उपाध्यक्ष अनंताशेठ मोरू म्हात्रे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी संजय भोये उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनात 100 पेक्षा जास्त विविध प्रयोग सादर करण्यात येणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमधील विविध स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन यात क्रमांक पटकावणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 4 जानेवारी रोजी सायंकाळी 3 वाजता बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या ममता म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. 3 आणि 4 जानेवारी रोजी विविध स्पर्धेत आणि विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पाहण्यासाठी तसेच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सर्व पालक, नागरिक आणि उरणकरांनी न्यू इंग्लिश स्कूल, मोरा येथे भेट द्यावी असे आवाहन पंचायत समिती उरण, शिक्षण विभाग आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Exit mobile version