| पनवेल | वार्ताहर |
उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा पक्ष अभयारण्यातील पाणी काही प्रमाणात आटल्याने अरण्यातील पक्षी तहानलेले असून गेल्या वर्षी बांधण्यात आलेल्या नवीन जाळीच्या बंधाऱ्यात काही प्रमाणातच पाणी शिल्लक असून मे महिन्यात तीव पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पनवेल शहरापासून 12 किमी अंतरावर अतिशय सुंदर रमणीय व विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्ष्यांनी समृध्द असे कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळयाप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय, रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, कर्नाळा पक्षी अभयारण्य भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ, पोपट, सुर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे 134 प्रजातीचे स्थानिक तर 38 प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात. दरम्यान, कडक उन्हामुळे हे पक्षी उन्हाळयात अडचणीत सापडतात. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अभयारण्य परिसरात पक्ष्यांसाठी तीन तलाव खोदण्यात आले असले तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यंतरातच हे तलाव तळ गाठतात. गेल्या वर्षी सुद्धा लवकरच तलावातील पाणी बदलत्या हवामानामुळे आटले. त्यामुळे अभयारण्यात गेल्या काही वर्षापासून उन्हाळयात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, संपूर्ण अभयारण्यात पाण्यासाठी एकच बोअरवेल असून पाईपलाईनच्या माध्यमातून विश्रामगृहापर्यंत पाणी नेले जात होते. परंतु, कडक उन्हाळयात पाणी पुरेशे पडत नाही. विशेष म्हणजे 12 कि.मी. क्षेत्र असलेल्या या अभयारण्यात कुंडया ठेवाव्या लागत होत्या. मात्र, गेल्या वर्षी पाणीटंचाई निवारण्याकरीता प्रशासनाने विश्रामगृहालगत असलेला सिमेंटच्या बंधाऱ्यातील माती आणि गाळ उपसला आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्याची डागडूजी सुध्दा केली असून पाणी टंचाईवर वन विभागाकडून विविध उपाय योजना राबवल्या जात असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.