| रसायनी | वार्ताहर |
सेंट विन्सेंट पलौटी शाळेमध्ये गुरुवार, दि.11जुलै रोजी इन्वेस्टीचर सेरेमनी आयोजित केली गेली होती. यामध्ये पहिली ते दहावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये शालेय विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी-उपप्रतिनिधी, पिवळा हाऊस, निळा हाऊस, लाल हाऊस, केशरी हाऊस प्रतिनिधी-उपप्रतिनिधी, खेळ सचिव, सांस्कृतिक सचिव, खजिनदार, शिस्त सचिव, सरचिटणीस, वर्ग प्रतिनिधी यांची निवडणूक केली गेली. रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस मिरांडा, शाळेचे मुख्याध्यापक फादर जोएल वास व फादर सायमन लोबो यांनी पुष्पगुच्छ, शाल व शाळेचे स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
निवड झालेल्या प्रतिनिधीने आपले कर्तव्यपूर्ण निष्ठेने पार पाडण्याची शपथ घेतली. अंशुमन बेहरा याला शाळेय विद्यार्थी प्रतिनिधी व श्रुती शिर्के हिला शालेय उपप्रतिनिधी ही पदवी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात वेगवेगळे नाटक व नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यास करण्याचा आणि खेळण्याचा संदेश दिला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक फादर जोएल वास यांनी शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग यांचे कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडल्याबद्दल कौतुक केले व उपस्थित पालकवर्गाचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांना दिलेली जबाबदारी पार पाडत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. शेवटी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता केली.