आरोग्य तपासणीसह शैक्षणिक मार्गदर्शन; डॉ. राजेश पाचारकर यांचे योगदान
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे डॉ. राजेश पाचारकर यांच्यामार्फत दि.17 ते 20 डिसेंबर दरम्यान आरोग्य तपासणीपासून शैक्षणिक मार्गदर्शनापर्यंत विविध उपक्रमांचं यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा व अंगणवाडी सेविका यांच्याजवळ संवाद साधताना आपल्या परिसरातील बारा वर्षाखालील लहान मुलांना कोणताही गंभीर आजार असेल तर शोध घेण्याचे आवाहन केले. जर असा रुग्ण आढळल्यास त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचार करू शकत नसल्यास त्याच्या उपचारासाठी शक्य तितके सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. आशा व अंगणवाडी सेविका बालकांच्या आरोग्य व्यवस्थेतील पहिली पायरी असून त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक बालकांचे प्राण वाचू शकतात. या आवाहनाला आशा व अंगणवाडी सेविकांनी सकारात्मक प्रतिसाद देत बालकांच्या आरोग्य शोध मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशन मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे दीडशे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजन पातळी, शरीराचे वजन आणि इतर वैद्यकीय तपासणीबरोबरच रुग्णांना उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेस हातभार लावण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रास विविध प्रकारची औषधे, ड्रेसिंग सामान, कॉटन, उच्च प्रतीच्या सुया आणि सिरींज, थर्मामीटर, त्वचारोगाची औषधे, तसेच प्राथमिक उपचारासाठी उपयुक्त असे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आलं.
लहान वयातच मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात या उद्देशाने रा.जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छता, नियमित हात धुण्याचे महत्त्व, दातांची काळजी तसेच आजारांपासून बचावासाठी स्वच्छतेची भूमिका खाण्याच्या सवयी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता किट भेट देण्यात आले. याचबरोबर मोहनलाल सोनी विद्यालयातील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आरती पाचारकर यांनी मासिक पाळीबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. यात मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व, आहार, आरोग्यविषयक गैरसमज तसेच नियमित तपासणीचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी दोनशे विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिन, स्वच्छता किट आणि मासिक पाळीबाबत माहीतीपत्रकांच वाटप करण्यात आलं.
डॉ. पाचारकर यांनी याच विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करण्याबरोबरच नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, पाठ्यपुस्तकावर आधारित तयारी आणि उत्तरलेखन कौशल्य यावर भर द्यावा, असे आवाहन केलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सराव उत्तर पत्रिका व स्टेशनरी किटचं वाटप केलं.
आरोग्य व शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या दोन्ही क्षेत्रांत सर्वांनी मिळून सातत्याने कार्य करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन राखावा.
– डॉ. राजेश पाचारकर







