। रायगड । प्रतिनिधी ।
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टुडंट कौन्सिल कमिटीच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.10) माणी व भुते येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील आरोग्य व्यवस्थापन, ॲनिमिया निर्मूलन तसेच हिपॅटायटीस ‘बी’ लसीकरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता.
तसेच, शनिवारी (दि.11) महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले. आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राध्यापक डॉ. सुधाकर बांटेवाड, डॉ. विशाल उबाले, आरसीएफचे रमेश कवळे तसेच रक्तपेढीचे डॉ. गोसावी यांची उपस्थिती होती. विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सोमवारी (दि.13) 18 तासांच्या अध्ययन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. तर मंगळवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. पूर्वा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम
