। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी परिसरातील तुराडे ग्रामपंचायतमधील महिलांसाठी नुकताच सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महिलांना ब्युटी पार्लर व आर्थिक साक्षरता यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. ज्या महिलांना आपली कला व्यावसायिक दृष्टीने सादर करायची आहे, अथवा काहींना घरातूनच आपल्या कौशल्याने आर्थिक उत्पन्न निर्माण करायचे आहे. यांसाठी ओटीकर कंपनी, संहिता आणि स्पेरूल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व तुराडे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी 30 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महिलांना ब्युटी पार्लरचे प्राथमिक प्रशिक्षण देऊन किट देण्यात आले. तर, आपली आर्थिक बचत कशी करावी, बचत केल्याचे फायदे, कोणकोणत्या माध्यमातून बचत करावी?, अशा विविध मुद्यांच्या आधारावर आर्थिक साक्षरता प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले. एकंदरीत या शिबिरासाठी तुराडे गाव, कष्टकरी नगर, मुकुंदवाडी, ठाकूरवाडी येथील एकूण 80 महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. सहभाग घेतल्याप्रकरणी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.







