चालक-वाहकावर निलंबनाची कारवाई
। वर्धा । वृत्तसंस्था ।
वर्ध्यातून पंढरपूरकडे निघालेल्या बसला हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. अपघातात सुदैवाने 45 वारकरी थोडक्यात बचावले, तर दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी आता मद्यपान करून वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बस चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी (दि.15) जुलैच्या रात्री पुसद येथे वारकऱ्यांच्या या बसचा अपघात झाला. यात एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले. वर्ध्यावरुन वारकऱ्यांना घेऊन एसटी पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. मध्यरात्री या एसटीचा भीषण अपघात झाला. वर्ध्याहून निघालेल्या एसटीचा पुसदजवळ अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने पुसदमधील माहुर फाट्यावर सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एसटी एका डिव्हायडरला जाऊन आदळली. एसटीने डिव्हायडरला एवढ्या जोरात धडक दिली की, आतमध्ये बसलेले वारकऱ्यांना हादरले बसले.
परिणामी विभागीय नियंत्रकाने या बस चालक आणि वाहकावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासात बसमध्ये चालक आणि वाहकाजवळ दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. या भीषण अपघातात सुदैवाने 45 वारकरी थोडक्यात बचावले, तर दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सचिन गंगाधर गव्हाणे चालक तर प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी असे मद्य प्राशन करणाऱ्या निलंबित वाहकाचे नाव आहेत. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघाताची चौकशी सुरू केली आहे.