। मुंबई । प्रतिनिधी ।
महायुती मोठे बहुमत मिळवून सत्तेवर आली आहे. मात्र, मंत्रिपदावरून धुसफूस सुरूच असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारी सुरू आहेत. गृहखाते कुणाकडे असणार, हे देखील स्पष्ट झालेले नाही. एकीकडे मंत्रिपदांवरून साठमारी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारसह केंद्राचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.
दिल्लीत संसद परिसरात बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, इतके मोठे बहुमत मिळाले आहे. निकाल 23 तारखेला लागला, पण सरकार बनवायला 5 तारीख उजाडावी लागली आहे. देशाच्या संविधानाच्या माध्यमातून महामहीन राज्यपालांचा अधिकार अध्यक्षांनी वापरला आणि संविधान विरोधी सरकार निर्माण झालेले आहे. त्यावेळी मोठा इव्हेंट केला. सेलिब्रिटींना बोलावले गेले. त्यात कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. परंतु, यावेळी फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यातच महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुर्ल्यात मोठी घटना घडली. त्यात सात लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. परभणी येथे आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणार्या संविधानाच्या पुस्तकाची विटंबणा करण्यात आली. यामुळे जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये अनेक लोक जखमी झालेले आहेत. सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच पूर्ण नाही, कारण खातेवाटप झालेले नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.