| रसायनी | वार्ताहर |
वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणारी ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीचा विस्तारही मोठा आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 यशस्वी करण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंढे, उपसरपंच भुषण पारंगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामपंचायतीला स्वच्छता कमिटी, व्यापारी वर्ग, आशा सेविका, महिला बचत गट आणि ग्रामस्थांकडून सहकार्य होत असल्याने ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे पर्यावरण संतुलनाबरोबर सामाजिक कार्य ग्रामपंचायतीकडून होताना दिसत आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा यांनी ग्रामपंचायत हद्दीतील रहदारीची ठिकाणे, वळण, रस्त्यालगतच्या मंदिरांच्या भिंती आदींवर घोषवाक्य लिहून आकर्षक रंगरंगोटीतून जनजागृती केल्याचे दिसत आहे. वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून नवीन बांधकाम परवाना देताना पर्यावरण संतुलन तसेच गटार, पाणी याचे नियोजन, डासमुक्त परिसर, नवीन बांधकाम करताना ते पर्यावरणपूरक, झाडे लावणे व ती जोपासना करण्यासाठी आणि नियमांना बांधिल राहील, याकडे ग्राम पंचायतीने लक्ष दिले आहे. झाडांच्या बिया गोळा करण्यात येत असून, सीडबॉल तयार करण्यात येत आहेत. गाव, आदिवासी वाडी वस्ती येथील शाळांमधून मुलांच्या कौशल्य गुणांची पारख करून त्यांना मदत आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या कला गुणांना वाव दिला जात असून त्यांच्याही माध्यमातून माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.
प्लास्टिक पिशव्या बंदी करण्यासाठी स्वच्छता कमिटी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत स्वच्छता मोहिम गेल्या तीन महिने राबवित असल्याने दुकानदारांनी कापडी पिशव्या वापरण्यावर अधिक भर दिला आहे.आपत्ती व्यवस्थापन शिबिर, लावलेल्या वृक्षांची जोपासना करून नवीन झाडांची लागवड केली आहे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी झाडे दत्तक घेतली आहेत. भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंच महाभूते या पंच महाभूते तत्वांचा आधारे प्रत्यक ग्राम पंचायत सदस्य आपल्या प्रभागात प्रभावी काम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. माझी वसुंधरा अभियान हे अभियान न राहता ते कायमस्वरुपी ठेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम केले जात असल्याचे सरपंच उमा मुंढे आणि ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी सांगितले.