वसुबारस सण उत्साहात साजरा

| आगरदांडा | वार्ताहर |

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या दिवशी शेतकरी वर्गानी गाईची तीच्या वासरासह पुजा करुन वसुबारस सण उत्साहात साजरा केला.

या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करण्याची परंपरा आहे. घरातील सुवाशनी महिला गाईच्या पायावर पाणी घालुन हळद-कुंकू, फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळीसह अन्न पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
काही ठिकाणी या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावन गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होत. म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते, असे बोलले जाते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा असते.

Exit mobile version