स्थानिक पुढार्यांकडून धनदांडग्यांना पाठिंबा; वासवानीविरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे वासवानी ग्रुपच्या मालकीची 120 एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी भराव टाकून कांदळवन नष्ट केले असल्याची बाब आठ वर्षापुर्वी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी जवळपास 48 एकर जागेतील संपूर्ण खारफुटीची झाडे तोडून नष्ट करण्यात आली होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी तलाठी, तहसिलदार तसेच थेट जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून जमिन मालक वासवानी यांनी शासनाचे नियम पायदळी तूडवित पुन्हा एकदा भराव करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक फायद्यासाठी स्थानिक पुढारीदेखील त्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनय कडवे यांनी केले आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी बुधवारी (दि.3) जिल्हाधिकार्यांना दिले आहे. विशेष म्हणजे ही जमीन नाविकास झोनमध्ये असून त्याठिकाणी कोणताही भराव अथवा बांधकाम करण्यास परवानगी नाही.
कांदळवनाच्या हरितपट्ट्यावर धनदांडग्यांचे नष्टचर्य सुरू असताना जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अनेकदा तक्रारी करुनही रेणूका हरकीसनदास वासवाणी व गोविंद बुलचंद वासवानी रिसोर्ट प्रा. लि तर्फे अखत्यारी इम्तियाज पालकर यांनी तत्कालिन ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचांच्या परवानगीने कांदळवनाच्या जागेत 2014 मध्ये 190 ब्रास भराव केला होता. त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारीनूसार तत्कालिन मंडळ अधिकार्यांनी पंचनामा करुन हा भराव अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या पुराव्यानुसार भराव करणार्यांवर मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.
या जागेत भविष्यात भराव अथवा बांधकाम झाल्यास मिळकतखारसहित सारळ, बागदांडा, आवळीपाडा, मळा या गावांना पुराचा धोका असून गाव पाण्याखाली जाण्याची भितीदेखील आहे. याबाबतचा अर्ज 18 नोव्हेंबर 2020 रोजी शासकिय कार्यालयांमध्ये केला आहे. डेब्रिज आणि मातीचे अनेक ट्रक आजही या भागात दाखल होत असल्याने या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी विनय कडवे यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली आहे.
आदेशांना केराची टोपली
वासवानी यांच्या जागेत बंधारा बांधण्याच्या कामाबाबत तहसिलदार यांच्याकडे आरटीएस अपिल प्रलंबित असतानाही वासवानी यांच्याकडून बेकायदेयशीरपणे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाला न जुमानणार्या धनदांडग्यांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रिसोर्ट उभारण्याचा घाट
120 एकर जागेत रिसोर्ट उभारण्याचा वासवानी यांचा मानस आहे. त्यानुसार सध्या मिळकतखार येथील खाडी किनार्यावर कांदळवनाची कत्तल करून रिसोर्ट उभारण्याचा घाट जिल्हा प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वासवानी यांनी गावासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या भरावाला कोणाचाही विरोध नाही. विनय कडवे, गिरीश कडवे, रोशन कडवे, राकेश कडवे यांचा विरोध आहे. याबाबत कोणत्याही वृत्तपत्रात बातमी आल्यास गावकी त्यांच्याविरोधात मोर्चा काढणार असल्याचे गावकीने ठरविले आहे.
अभिजीत कडवे
उपसरपंच, मिळकतखार