वावे-बेलोशी रस्त्याचे झाले तळे

रस्त्यावरून वाहन चालविणे जिवेघेणे

| अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील बेलोशी-वावे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविणे जिवेघेणे होत आहे. बुधवारी मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. आता ही स्थिती असल्यास पावसाळ्यात काय परिस्थिती होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील बेलोशी-वावे हा साडेचार किलो मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या रस्त्याची डागडूजी दीड वर्षापुर्वी करण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी सुखावून गेले होते. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे रस्त्याची अवस्था झाली आहे. वावेपासून बेलोशीपर्यंत ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे आहेत. या खड्डयातून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. एक खड्डा चुकविण्यास गेल्यास दुसरा खड्डा आडवा येत आहे. त्यामुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग करेल अशी अपेक्षा होती. परंतु, पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही हालचाल सुुरू नाही. या रस्त्याच्या डागडुजीसह नुतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु, रस्त्यावरील खड्डे कायमच असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसात बेलोशी-वावे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बेलोशी-वावे रस्त्याचे काम अर्थसंकल्पातून मंजूर आहे. चौल-वावे-बेलोशी पर्यंतच्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांचे मंजूर डांबरीकरण, मजबूतीकरण केले जाणार आहे. पावसाळ्यापुर्वी येथील खड्डे बूजविण्याचे काम केले जाणार आहे.

राजू डोंगरे
उपअभियंता- अलिबाग
Exit mobile version