वेदांता, फॉक्सकॉन पुन्हा महाराष्ट्रात येणे अशक्य -पवार

। पुणे । प्रतिनिधी ।

वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे दुर्दैवी आहे. हा प्रकल्प आता परत महाराष्ट्रात येऊ शकत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार यांनी वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचे आमिष दाखवले जात असून याला काही अर्थ नाही. हे तर लहान मुलांची समजूत काढल्यासारखे आहे. पण तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही, असे म्हटले आहे.

मोदी शाहा यांचे सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरातसारख्या राज्यांना होतो. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे गुजरातमध्येच सर्वांत जास्त दौरे झाले आहेत. त्यामुळे आता या विषयावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही. यानंतर जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात कसे येतील, यावर सरकारने लक्ष द्यावे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात येत आहे. पण सामंत, शिंदे हे महाविकास सरकाच्या वेळेस मंत्री होते. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करणे योग्य नाही.

शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष

…तर मोदींचे स्वागतच करुन
नरेंद्र मादी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत करू. पण सध्याच्या स्थितीवरून असे दिसतंय की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणे शक्य नाही. त्याच्या बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचे आमिष दाखविणे म्हणजे रडणार्‍या पोराला फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं आहे, असा टोला पवारांनी लावला आहे.

Exit mobile version