आवक घटल्याने भाजीपाला महागला

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने या कालावधीत अनेक जण शाकाहाराला पसंती देतात. परिणामी, सणाच्या काळात बाजारात भाजीपाल्याला, तसेच कांदा-बटाट्याला मोठी मागणी आहे. दुसरीकडे, बाजारात भाजीपाल्यासह कांदा आणि बटाट्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले आहेत. या काळात शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला असूनही तो बाजारात पोहोचत नाही. त्यामुळे बाजारातील आवक घटली असून दर काहीसे वाढल्याचे दिसत आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. प्रत्येकजण उत्सवात आनंद साजरा करण्यात गर्क आहे. शेतकरी आणि व्यापारीही या काळात आपल्या गणरायाचे आदरातिथ्य करण्यासाठी घरी थांबत असतो. शिवाय, घरी गणपती असल्याने, या काळात शेतात काम करायला कुणी तयार होत नाही. भाज्यांचे विचार करता, या काळात भाज्यांची तोडणी करायला मजूर उपलब्ध होत नाहीत. अनेक शेतकरीही शेतात जात नाहीत. परिणामी बाजारात मुबलक भाजीपाला पोहोचत नाही. त्यामुळे शहरातील बाजारांत भाज्यांच्या दरात वाढ होऊ लागते. त्यानुसार आता भाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे.

भाज्यांचे दर (किलो)
मटार - घाऊक 50 ते 60 रु., किरकोळ 80 ते 100 रु.
फरसबी, गवार, सुरण- घाऊक 40 ते 50 रु., किरकोळ 80 ते 100 रु.
हिरवी मिरची- घाऊक 40 ते 50 रु., किरकोळ 80 ते 100 रु.
वांगी, शिमला मिरची, घेवडा- घाऊक 30 ते 40 रु., किरकोळ 60 ते 80 रु.
Exit mobile version