मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
पोलीस विभागाकडून सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख रस्ते, चौक व संवेदनशील ठिकाणी वाहनांची सखोल तपासणी व नाकाबंदी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवली फाटा येथे वाहन तपासणी करण्यात येत असून, दिघी बंदर व दिवेआगार शेखाडी श्रीवर्धन या समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासणी करण्यात येत आहे.
या सुरक्षा मोहिमेनुसार संशयास्पद वाहने, कागदपत्रे व चालकांची कसून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर महिनाभरात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 35 वाहनचालकांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करत साडेतीन लाख रुपये दंडाची वसुली करण्यात आली. मागील काही महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे अपघातात काही नागरिकांना प्राण गमवावे लागले होते, तर काही जणांना कायमचं अपंगत्व आलं आहे. त्यामुळे ही मोहीम अपघात रोखण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे मद्यधुंद वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी स्पष्ट केले.







