व्हेनेझुएलाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा

| इंगलवूड | वृत्तसंस्था |

व्हेनेझुएलाने आपली विजयी लय कायम राखताना मेक्सिकोला 1-0 अशा फरकाने नमवत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सामन्यातील एकमेव गोल 57व्या मिनिटाला कर्णधार सालोमोन रोन्डोन याने पेनल्टीच्या माध्यमातून केला.

व्हेनेझुएलाने आपल्या पहिल्या सामन्यात इक्वेडोरला 2-1 अशा फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे ‌‘ब’ गटात ते किमान दुसऱ्या स्थानी राहणार हे निश्चित झाले आहे. ते आपला अखेरचा सामना रविवारी जमैकाविरुद्ध खेळणार आहेत. जमैकाचा संघ यापूर्वीच बाद फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मेक्सिकोने जमैकाला 1-0 असे पराभूत करत सुरुवात केली होती. त्यांचे इक्वेडोर इतकेच तीन गुण आहेत. मेक्सिकोला आपला अखेरचा सामना रविवारी इक्वेडोरशी खेळायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवेल. त्यापूर्वी, गुरुवारी झालेल्या सामन्याच्या मध्यंतरापर्यंत मेक्सिकोने व्हेनेझुएलाला रोखून धरले होते. मात्र, दुसऱ्या सत्रात त्यांनी गोल करत मेक्सिकोच्या अडचणी वाढवल्या. यानंतर व्हेनेझुएलाने भक्कम बचाव करताना अखेरपर्यंत मेक्सिकोला गोल करण्याची संधी दिली नाही.

इक्वेडोरची जमैकावर मात
अन्य सामन्यात इक्वेडोरने जमैकावर 3-1 अशा फरकाने विजय नोंदवला. इक्वेडोरचा 2016 नंतर कोपा अमेरिका स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी, पहिल्या सामन्यात त्यांना व्हेनेझुएलाकडून पराभूत व्हावे लागले होते. जमैकाच्या केसी पाल्मरकडून झालेल्या स्वयंगोलमुळे इक्वेडोरला आघाडी मिळाली. यानंतर पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत केंड्री पाएझने गोल करत इक्वेडोरला 2-0 असे आघाडीवर नेले. उत्तरार्धात जमैकाच्या मिखाइल अँटोनिओने गोल करत आघाडी कमी केली. मात्र, भरपाई वेळेत ॲलन मिंडाने गोल केल्याने इक्वेडोरने सामना 3-1असा जिंकला.
Exit mobile version