वेणगाव हत्या प्रकरण! सहा तासात लावला आरोपींचा तपास  

पळण्याच्या तयारीत असणारे तिघे जेरबंद 

| रायगड । प्रतिनिधी । 

पूर्व वैमनस्य आणि रोजच्या धमक्यांना कंटाळून तिघांनी एकाची लाकडी दंडक्यांनी मारहाण करून हत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव गावात शुक्रवार दि.23 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. गुन्हा घडून सहा तास उलटत नाही तोच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या खालापूर पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा रायगडचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्‍वाखाली हत्येचा तपास लावला. हत्या करून तीन जण पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. गणेश पालकर, प्रल्हाद सावंत, राकेश चौधरी अशी हत्येच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. 

कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव गावात राहणारा कुणाल अरुण आमरे याने दहशत नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवरून ग्रामस्थांना धमकवण्याचे प्रकार त्याने सुरू केले होते. गावातील वाढलेल्या या त्याच्या कारवायांची तक्रार देण्यास देखील ग्रामस्थ घाबरत होते. याचाच फायदा घेऊन त्याने गावात दादागिरी करून त्याने दहशत निर्माण केली होती. तीन वर्षापूर्वी तो मोठे वेणगाव येथील माजी उपसरपंच गणेश पालकर याच्या विधवा बहिणीच्या घरात घुसला होता. या प्रकरणात गणेश आणि कुणाल यांच्यामध्ये शाब्दिक चकामकीतून वैमनस्य तयार झाले होते. शुक्रवारी (दि.23) रात्री कुणाल चाकू घेऊन गणेश याला मारण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी गणेशला समजावून घरात पाठविले होते. थोड्यावेळाने गणेश आपल्या कार्यालयात जाऊन बसला. कुणाल चाकू घेऊन गणेशच्या कार्यालयात घुसला. त्याठिकाणी झालेल्या शाब्दिक चकमकीचे मारहाणीत रूपांतर झाले. त्यावेळी गणेशच्या सोबत असलेल्या प्रल्हाद सावंत आणि राकेश चौधरी यांनी देखील कुणालला मारहाण केली. या मारहाणीत कुणालचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर गणेश, प्रल्हाद आणि  राकेश हे लपून बसले होते. शनिवारी कर्जत पोलिसांनी खालापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला संपर्क केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवली. हत्या करणारे तिघे लोणावळ्याच्या दिशेने जीपमधून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ज्या जीपमधून तिघे पळून जात होते त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तिघे पोलिसाना न जुमानता वाहनाचा वेग वाढवून ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. या तिघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे  पोलिसांनी सांगितले. 

स्थानिक गुन्हे शाखा खालापूर पथकाने यशस्वी कामगिरी केली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, सहाय्यक फौजदार राजा पाटील, प्रसाद पाटील, पोलीस हवालदर संदीप पाटील, यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, जितेंद्र चव्हाण, पोलीस शिपाई अक्षय सावंत, रुपेश निगडे, स्वामी गावंड यांचा समावेश आहे.

Exit mobile version