| अलिबाग | प्रतिनिधी |
पेणमधील मळेघर येथील आदिवासी वाडीवरील तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील दोषी आदेश पाटील याच्या विरोधात सोमवारी अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केल्याने 30 डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे.
आरोपीवर आधीच नऊ गुन्हे दाखल असून समाजात वावरण्यास पात्र नाही, असा युक्तिवाद निकम यांनी यावेळी केला आहे. पंजाबमधील तीन खटल्यांच्या निकालाचा आधार घेत आरोपी आदेश पाटील याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली. आरोपीच्या वकीलांनी जन्मठेप मिळावी यासाठी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला असून या खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे पेण येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील अंतिम निकाल हा 30 डिसेंबर रोजी जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस. राजंदेकर देणार आहेत.
हा गुन्हा जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.