। पुणे । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
प्रभा अत्रे आज ‘स्वरप्रभा’ या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होत. वयाच्या 92 वर्षी देखील त्या गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या. आज (दि.13) पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं.
प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे.







