| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनानाथ मसणाजी पाटील (दिना गुरुजी) यांचे शनिवार, दि. 11 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै. दिना गुरुजी यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून पोलादपूर व श्रीवर्धन तालुक्यांत प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यानंतर अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा व वाघ्रण येथे मुख्याध्यापक म्हणून कार्य करत त्यांनी निवृत्ती स्वीकारली. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी शेतकरी कामगार पक्षात सक्रिय भूमिका बजावत पक्षविस्तारासाठी योगदान दिले. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्यासह पवारशेठ व शं. भि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षाचे कार्य जोमाने केले.
धार्मिक व सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. ते श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. भजन मंडळ, एकादशी हरिनाम सप्ताह यांसारख्या धार्मिक उपक्रमांत ते सातत्याने सहभागी होत असत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, पाच भाऊ, एक बहीण, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ. मनोज पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, दुसरे पुत्र प्रेमानंद पाटील वायरमन आहेत, तर तिसरे पुत्र केशव पाटील हे पवन हाऊस (हेलिकॉप्टर) सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. दिनानाथ पाटील यांच्या निधनानंतर बहिरीचापाडा व परिसरात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचा तेरावा विधी शुक्रवार, दि. 24 एप्रिल रोजी विठ्ठल मंदिर, बहिरीचापाडा येथे त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
