ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन

। मुंबई । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन झालं आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी संगीत नाटकांत कीर्ती शिलेदार यांचे मोलाचे योगदान आहे. संगीत नाटकांची परंपरा जिवंत ठेवण्यात त्याचा मोठा वाटा आहे. दिवंगत नाट्य अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या.
जयराम आणि जयमाला शिलेदार यांची कन्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येवू शकत नाही. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. तिथून त्यांचा प्रवास सुरु झाला.
जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता. 2018 मध्ये त्यांनी 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version