मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ लेखिका आणि पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पती ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकप्रभा’चे माजी संपादक प्रदीप वर्मा यांनी ही माहिती दिली. मराठी साहित्यक्षेत्र, पत्रकारितेमध्ये पुष्पा त्रिलोकेकर यांचे मोठं योगदान आहे. पुष्पा त्रिलोकेकर यांच्या निधनानं मराठी पत्रकारितेचं मोठे नुकसान झालं असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. निर्भय आणि निर्भीड पत्रकारिता ही पुष्पा त्रिलोकेकर यांची ओळख होती. आक्रमक पत्रकारिता आणि ओघवती भाषा त्यांनी आचार्य अत्रेंकडून आत्मसात केली होती. काही काळ ब्लिट्झमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून लेखन केले. साप्ताहिक श्री, साप्ताहिक लोकप्रभा, दैनिक प्रत्यक्ष, दैनिक कृषीवल, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती आदी साप्ताहिक पुरवण्यात विविध विषयांवर लेखन केले आहे.