| अलिबाग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेला खांदेरी दुर्ग हा स्वराज्याच्या सागरी इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. 31 डिसेंबर 1679 रोजी या दुर्गावर स्वराज्याच्या आरमाराचा भगवा झेंडा अभिमानाने फडकविला गेला होता. त्यामुळे या ऐतिहासिक विजय दिनाचे औचित्य साधून बुधवारी (दि.31) खांदेरी दुर्गावर ऐतिहासिक विजय दिन साजरा करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम थळ बाजार जेट्टी येथील खांदेरी दुर्ग समोरील किनाऱ्यावरील खुबलढा बुरुज येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून खांदेरी दुर्गाचे स्वराज्यासाठी असलेले रणनीतिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि मराठा आरमाराचा पराक्रम नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते तसेच खांदेरी दुर्गावरील वाघबकरी या बैठ्या खेळांचे संशोधक पंकज भोसले हे खांदेरी दुर्गाचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगणार आहेत. त्यासोबतच उपस्थितांना स्वराज्यकालीन शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी छोटेखानी ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वराज्याच्या आरमाराला बळ देणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे उपस्थित राहणार आहेत.
नववर्ष स्वागताच्या झगमगाटात हरवून जाणाऱ्या या ऐतिहासिक विजय दिनाची आठवण समाजमनात पुन्हा जागवण्याचा हा प्रयत्न असून, नागरिकांनी, इतिहासप्रेमींनी व तरुण पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आपला कट्टा संस्था, आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन, शिवशंभू विचार मंच कोकणप्रांत आणि सागरी सीमा मंच कोकणप्रांत यांच्यावतीने करण्यात आले आहे.






