रायगडची विजयी घोडदौड

दक्षिण विभागाचा एक डाव 78 धावांनी पराभव

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आमंत्रित 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायगडाने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. चौथ्या सामन्यात रायगड संघाने दक्षिण विभाग संघाचा एक डाव 78 धावांनी पराभव केला. या सामन्यात अथर्व पाटील याने दोन्ही डावांत मिळून नऊ आणि पंकज इटकरने आठ बळी मिळवले.

दक्षिण विभाग संघाने प्रथम फलंदाजी करताना 34 षटकांत सर्व गडी गमावून 65 धावा केल्या. रायगडच्या गोलंदाजीसमोर एकही फलंदाज तक धरू शकला नाही. रायगडच्या अथर्व पाटील 15 धावत 6 बळी, तर पंकज इटकरने 12 धावा देऊन 4 बळी घेतले.

आशीर्व पाटील (83 धावा), पार्थ पवार (37 धावा), मंत्रा पाटील (30 धावा) आणि पंकज इटकर (29 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर रायगडने पहिल्या डावात 234 धावा करुन दक्षिण विभागावर 169 धावांची आघाडी घेतली.

पंकज इटकर व अथर्व पाटील यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण विभाग संघाचा दुसरा डाव 91 धावांवर आटोपला. रायगड संघाने हा सामना एक डाव आणि 78 धावांनी जिंकला.

दक्षिण विभागाच्या दुसऱ्या डावात पंकज इटकरने 27 धावा 4 बळी आणि अथर्व पाटील याने 33 धावा 3 बळी मिळवले. अथर्व पाटील याने दोन्ही डावांत मिळून नऊ आणि पंकज इटकरने आठ बळी मिळवले. प्रशिक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची घोडदौड चालू आहे.

Exit mobile version