| उरण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न: भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने वीज कंत्राटी कामगारांचा भव्य विजय मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार 2285 वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे 1167 वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा निकाल कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून संपूर्ण देशातील कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक ठरणारा आहे. वीज कंत्राटी कामगार संघाने रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने, पुणेमुंबई पायी मोर्चा, मंत्रालयावर धडक मोर्चा, नागपूर येथे धडक मोर्चा तसेच संविधान चौकातील उपोषण या संघर्षांची त्यांनी विशेष दखल घेतली. यापुढे विविध उद्योगांतील कंत्राटी व असंघटित कामगारांना लेबर कोडमधील लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने अधिक प्रभावी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई यांनी वीज उद्योगातील दीर्घकालीन कामगार चळवळीचा आढावा घेत कंत्राटी कामगारांसाठी संघटनेने मिळवलेली 20% व 19% वेतनवाढ तसेच नोकरी सुरक्षा (जॉब सेक्युरिटी) संदर्भातील प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले आणि शासनाकडून यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. या मेळाव्यास भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई व ज्येष्ठ वकील विजय वैद्य हे प्रमुख वक्ते होते. राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित राहून कामगारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कामगारांच्या उर्वरित प्रश्नांबाबत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
संघटनेचे माजी अध्यक्ष व मान्यवर शरद संत, श्रीपाद कुटासकर, सुभाष सावजी, धनंजय इनामदार, विजय मुळगुंद, आप्पा जाधव, अनंतराव मोडक, अण्णासाहेब धुमाळ, बाळासाहेब कांबळे, अर्जुन चव्हाण तसेच सर्व साक्षीदारांचा संघटनेतर्फे सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या मेळाव्यात संघटनेचे, अध्यक्ष निलेश खरात, कार्याध्यक्ष अमर लोहार, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटनमंत्री उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार यांनी संघटनेची आगामी दिशा व भूमिका स्पष्ट केली. 13 वर्षांचा हा संघर्ष अत्यंत कठीण असला तरी जिद्द, चिकाटी व सातत्यामुळे हे सामूहिक यश मिळाले आहे. वीज कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात छेडण्याचा ठराव मेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे येथील संघटनेचे पदाधिकारी सुमीत कांबळे, निखिल टेकवडे, मार्गदीप मस्के, प्रवीण पवार आणि त्यांच्या पूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले.
वीज कंत्राटी कामगारांचा विजय मेळावा
