फिरत्या वस्तुसंग्रहालयात प्राचीन संस्कृती, शिल्पकलेचे दर्शन

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा पुढाकार, चोंढीतील विद्यार्थ्यांसह दीड हजार नागरिकांनी दिली भेट


| रायगड | प्रतिनिधी |

प्राचीन संस्कृती आणि शिल्पकलेची माहिती सर्वसामन्यांना व्हावी. यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून अलिबागमध्ये हे फिरते वस्तुसंग्रहालय दाखल झाले आहे. अलिबाग तालुक्यातील चोंढी शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ अशा एकूण दीड हजारहून अधिक जणांनी या अनोख्या फिरत्या वस्तू संग्रहालयाला भेट दिली. भारतासह, ग्रीस, इजिप्त, असेरीया, रोम या देशातील शिल्प प्रतिकृती या वस्तूसंग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत. हे वस्तुसंग्रहालय सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती या उपक्रमाच्या समन्वयक शांतिनी सुतार यांनी दिली. शनिवारी मांडवा जेटी येथे हे प्रदर्शन नागरिकांना आणि पर्यटकांना पाहता येणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामार्फत गेली आठ वर्ष फिरते वस्तुसंग्रहालय हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयाची ओळख व्हावी. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी वस्तुसंग्रहालय प्रशासनाने दोन अत्याधुनिक बसची निर्मिती केली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरील वस्तुसंग्रहांचे प्रदर्शन या माध्यमातून भरवले जाते. यामाध्यमातून वस्तुसंग्रहालयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

अलिबाग तालुक्यातील शाळा आणि पर्यटन केंद्रांना हे वस्तुसंग्रहालय भेट देणार आहे. प्राचिन काळातील शिल्पकला कशी विकसित झाली. त्यात कशी वाढ होत गेली याची माहिती या उपक्रमातून मिळणार आहे. हे फिरते वस्तुसंग्रहालय पुढील पाच दिवस अलिबाग तालुक्यातील विविध शाळांना भेट देणार आहे.

Exit mobile version