| पनवेल | वार्ताहर |
18 व्या लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पनवेल येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. स्वतःला संजोग वाघेरे पाटील समजून प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला लागण्याची शपथ या मेळाव्यामध्ये घेतली. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची यावेळी मंचावरती उपस्थिती होती. विद्यमान खासदारांच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर यावेळी सर्वच वक्त्यांनी शब्दांचे कडक चाबूक ओढले.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमधील काँग्रेस भवन येथील सभागृहात हा बुथ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. शेकडोच्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या मेळाव्याला अप्रतिम प्रतिसाद लाभला. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संजोग वाघेरे पाटील यांचे मेळाव्यामध्ये स्वागत करण्यात आले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. या खेपेला अंगावर गुलाल पडलाच पाहिजे या विजीगिषू वृत्तीने कामाला लागा, असे त्यांनी तमाम कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावत यांनी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील न्याय योजना घरोघरी पोहोचविण्याचे तमाम बूथ कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर रायगडची मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते जीआर पाटील यांनी ओघवत्या शैलीत आपले मनोगत व्यक्त केले.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, स्वतःला उमेदवार समजून घरोघरी प्रचार करा. आपण सगळ्यांनी मनामध्ये मशाल एके मशाल ही एकमेव निशाणीच पक्की केली पाहिजे. पंतप्रधान राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करायचे आहे त्यासाठी प्रत्येकाने रात्रंदिवस एक केला पाहिजे, अशी भूमिका सुदाम पाटील यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी तथा माजी जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांचे भाषण विशेष लक्षवेधी ठरले. ते म्हणाले की, प्रत्येकाने मान अपमान दूर ठेवून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या निवडणुकीत उतरले पाहिजे. उन्हाचा कितीही तडाखा असला, लग्न सराईची कितीही धावपळ असली तरी देखील निवडणुकीचे काम महत्त्वाचे आहे. आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आपल्या भाषणात त्यांनी महानगरपालिकेच्या निर्मितीवर कडक ताशेरे ओढले. पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय शेजारील इमारतींना जर पाणी देता येत नसेल तर असल्या भाजपावाल्यांना मते मागायचा अधिकार नाही, असे देखील ते म्हणाले.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी आक्रमक शैलीत भाषण करताना संजोग वाघेरे पाटील यांना खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही असा खणखणीत आवाज दिला. ते पुढे म्हणाले की, जर मोदी तिसरून सत्तेत आले तर यापुढे देशात निवडणुका होणार नाहीत. अत्यंत हुकूमशाही पद्धतीने चाललेल्या भाजपवाल्यांच्या कारभाराविरोधात जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. भारत देश विरुद्ध मोदी असे या निवडणुकीचे स्वरूप झाले आहे. उरण विधानसभा मतदार संघ क्षेत्रामधून संजोग वाघेरे पाटील यांना आम्ही कमीत कमी 25 हजार ते 50 हजाराची आघाडी मिळवून देऊ. उपस्थित काँग्रेस बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, अत्यंत दणदणीत मेळावा आयोजित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आणि तुम्ही जी वातावरण निर्मिती केली आहे त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. हीच ऊर्जा आणि असाच उत्साह शेवटपर्यंत टिकवून ठेवा.
अत्यंत उत्साहात, संजोग वाघेरे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणांच्या दणकेबाज आवाजात सभागृह दणाणून गेले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत, मेळव्याचे मुख्य आयोजक पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी आर.सी. घरत यांचे समवेत माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष, प्रवक्ते डॉ. भक्ती कुमार दवे, ज्येष्ठ काँग्रेस नेते जी.आर. पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कमांडर कलावत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती जमाती महिला आघाडी अध्यक्ष माया अहिरे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा शशिकला सिंग, डॉ. अमित दवे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल, ज्येष्ठ काँग्रेस नेते अरविंद सावळेकर, विधी व न्याय सेल जिल्हाध्यक्ष ॲड. के. एस. पाटील, माजी नगरसेवक लतिफ शेख, शिवसेना शहर प्रमुख प्रविण जाधव, पनवेल शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख अर्चना कुळकर्णी, शिवसेना महानगर समन्वयक दीपक घरत, सहकार सेल पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष ॲड. अरुण कुंभार, ज्येष्ठ नेते अशोक उर्फ आबा खेर, महादेव कटेकर, वसंत काठावले, आदम दलवाई, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल चौधरी, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये डॉक्टर विजय चौहान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांच्या गळ्यात काँग्रेस मफलर घातला. तर, महेंद्र घरत आणि आर.सी. घरत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात स्वागत केले.
विद्यमान खासदारांनी दहा वर्षात किती कामे केली? मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केलेले एक काम जाहीरपणे सांगावे. स्वाभिमानी वृद्ध गद्दार असेच या निवडणुकीचे स्वरूप आहे. दुसऱ्यांचे पक्ष तोडून फोडून केल्या जाणाऱ्या राजकारणामुळे येथील जनता पिचली आहे. मी आश्वासन देतो की, मी जर खासदार झालो तर विभागनिहाय बैठका घेणार. संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मित्र पक्षांच्या नेते पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांना त्या बैठकीत आमंत्रित करणार. जे जे न सुटलेले प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आणि समस्यामुक्त मतदारसंघ करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विद्यमान खासदारांनी कुठल्याही प्रकारचे काम केले नाही. परंतु त्यांनी त्यांचा धनसंचय करण्याचे काम मात्र इमाने इतबारे केले आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 64 कोटी होती परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या संपत्तीचा आकडा 260 कोटी इतका फुगलेला आहे. 50 खोके एकदम ओके हे आम्ही उगाच नाही म्हणत.
संजोग वाघेरे पाटील
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर स्थापन होण्यापूर्वी सर्वपक्षीय आघाडी करून जनताभिमुख राजकारण करण्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयोग पनवेल तालुक्यात झाला. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्यात येथे अत्यंत सुंदर समन्वय आहे. आम्ही एकोप्याने काम करत असतो. त्यामुळे महाविकास आघाडी मधील मित्र पक्षांचा इथला जोड हा फेविकॉल इतका मजबूत जोड आहे.
माजी आमदार बाळाराम पाटील