विहूर, मोरा गावे मोबाईल नेटवर्कपासून वंचित

। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूर, बौद्धवाडी व मोरा या गावांना मोबाईल टॉवर नसल्याने अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या परिसरात लवकरात लवकर मोबाईल टॉवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

विहूर ग्रामपंचायत हद्दीतील विहूरसह बौद्ध वाडी आणि मोरा या गावांची सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. या परिसरात बाहेरून आलेल्या सुमारे चारशे ते पाचशे लोकांची वस्ती आहे. मोबाईल असुनही नेटवर्कपासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे. तसेच कोरोना काळानंतर सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन अभ्यास घेत असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आजच्या या धावत्या युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज आहे व जीवनातील अत्यावश्यक घटक बनले आहे. या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, शिक्षक, डॉक्टर, शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय व कर्मचारी आहेत. तसेच हॉटेल रिसॉर्ट सुद्धा आहेत या ठिकाणी पर्यटकांची येजा असते, या ठिकाणी पेट्रोल पंपसुद्धा आहे. त्यामुळे या परिसरात बाहेरून येणारे पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थांना, मुरुडमधील नागरिकांना मोबाईल टॉवर नसल्याने खुप मोठ्या प्रमाणात असुविधा होत आहे.

Exit mobile version