। माणगाव । वार्ताहर ।
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून माणगांव तालुक्यातील विहुले गाव स्वदेस फाऊंडेशन यांच्यावतीने स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात रुची खेमका, अतीनकुमार शहा, उमेश बिरारी उपविभागीय अधिकारी माणगाव, संगीता बक्कम, प्रदिप साठे व तुषार सूद यांच्या हस्ते करण्यात आली. स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी स्वप्नातील गाव गुणगौरव प्रमाणपत्र उपस्थित पाहुण्याच्या हस्ते प्रदान केले. तसेच विहुले स्वप्नातील गाव नाम फलकाचे अनावरण गावाच्या वेशीवर करण्यात आले.
गाव विकास समिती यांनी स्वप्नातील गाव वाटचाल सुरू झाल्यापासूनचे आपला अनुभव सादर केला. यामध्ये त्यांनी स्वदेस फाउंडेशन यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आजपर्यंत विहुले गावासाठी विकासकामे स्वदेस फाउंडेशन, शासन व लोकसहभागातून करण्यात आली असल्याचे सांगितले. स्वप्नातील गाव घडत असताना गावामध्ये गाव विकास समिती, स्वदेस फाउंडेशन व शासन यांच्या वतीने 62 प्रकारचे कार्यक्रम गावांमध्ये राबवण्यात आले. स्वदेस फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेली पाणीपुरवठा योजनेमुळे गावांमध्ये घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाण्याची उपलब्धता झाली आहे.
पाण्याची योजना सौर उर्जेवर करण्यात आली आहे. आरोग्य, स्वच्छता व उपजीविका याविषयी अनेक उपक्रम स्वदेस फाउंडेशनच्या वतीने गावांमध्ये राबवण्यात आले आहेत, शासनाच्या योजनेमधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना गावांमध्ये राबवण्यात आलेल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी पांडुरंग चाळके, साक्षी भोनकर, सुमित्रा पोटे, बबन दळवी, जयश्री शिर्के, सुयश नलावडे, हुसेन राहटविलकर, चंद्रमा वाघमारे, राजु कळबांडे, विजय महाडिक, उषा दळवी, विकास खरमाळे, मेघना फडके, भिमराव भालेराव, संकेत अहेर, सुबोध काणेकर, गायत्री खुटवळ, जगदीश्वर नटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दळवी यांनी केले. तर प्रास्ताविक समीर महाडिक यांनी केले. ग्रामस्थ, गाव विकास समिती, महिला मंडळ,मुंबई मंडळाचे सदस्य, युथ मंडळ, आजूबाजूच्या गावामधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.