माथेरानमधील अश्वचालकांची विजयादशमी

परंपरेनुसार घोड्यांचे पूजन व मिरवणूक

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे घोडा हे येथील प्रमुख वाहन असून या ठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक हा घोड्यावर बसून रपेट मारल्याशिवाय काही येथून जात नाही. घोडा हा एक मुख्य आकर्षण आहे. येथे आजही परंपरेनुसार विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर येथे घोड्याची विधिवत पूजा करून घोड्यांना सजवून ढोल ताश्यांच्या गजरात त्यांची येथील श्रीराम चौकातून मिरवणूक काढून अश्वचालकांनी आपला विजयादशमी सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी सणाला माथेरान मधील घोड्यांमुळे एक विशेष महत्व प्राप्त होते. माथेरान मधील घोडा हा येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. या विजयादशमीच्या सणाला येथे सर्व घोड्यांना सकाळी आंघोळी घालून त्यांची विधिवत पूजा करून त्यांना वेगवेगळ्या रंगी- बिरंगी फुलांनी, रंगीत झुलांनी, फुग्यांनी सजविण्यात येते. तसेच, या दिवशी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ढोल-ताशांच्या तालावर घोड्यांना येथे नाचविले जाते. त्यानंतर घोड्यांची मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक देखील काढली जाते. येथे वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या प्रथेला माथेरान मधील अश्वचालक त्याच उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होऊन येथे आपला आनंद द्विगुणित करतात. या सुट्टीच्या दिवशी येथे येणाऱ्या पर्यटकांना माथेरानमधील ही अनोखी विजयादशमी पहावयास मिळते आणि स्थानिकांच्या या आनंदात सर्वांना सहभागी होता येते.

दसरा हा सण आम्ही घोडेवाले खूप महत्त्वाचा मानतो. याच दिवसापासून आमच्या व्यवसायाला खरी सुरवात होते. यादिवशी आम्ही प्रत्येकजण आमच्या घोड्याची मनोभावे पूजाअर्चा करून त्याला सजवून अश्वपाल संघटनेमार्फत त्यांची मिरवणूक काढली जाते.

जयराज बर्गे, अश्वपालक

दसऱ्याच्या सुट्टीनिमित आम्ही माथेरानला आलो होतो. दुपारी फिरत असताना येथे वेगवेगळ्या प्रकारे सजलेले घोडे पाहिले. याबाबत माहिती घेतली असता हा येथील अश्वपालकांचा सर्वात मोठा सण आहे असे समजले. अतिशय आकर्षक पद्धतीने घोडे सजविलेले पाहून घोड्यावर बसण्याची इच्छा झाली व आम्ही आवर्जून घोड्यावर बसून घोड्याची एक रपेट केली.

राजन चक्रवर्ती, पर्यटक, मुंबई
Exit mobile version