| अहमदनगर | प्रतिनिधी |
नीलेश लंकेंमुळे विखे बाप-लेकांची झोप उडाली आहे. त्यांनी एका उद्योजकाला माझ्याकडे मध्यस्थीसाठी पाठवले होते. लंके सोडून दुसर्याला उमेदवारी द्या, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु मी त्यांचे ऐकले नाही. यावरून ते लंकेंना किती घाबरलेत हे दिसते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला.
नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुक्रवारी समारोप झाला. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘आपला उमेदवार हिरा आहे. तो या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न नक्कीच प्रभावीपणे मांडील. त्यांना भाषेची कोणतीही अडचण येणार नाही. विखे पिता-पुत्रांना आत्मविश्वास नाही. ते या पक्षातून त्या पक्षात फिरत असतात. लंके यांच्याकडे संपत्ती नाही, परंतु माणुसकी आणि लोकप्रेमाचा खजिना आहे.’ थोरात यांनीही विखेंवर टीका करताना ‘पाच वर्षे गडी दिसलाच नाही. दिल्लीला जाऊन मजा-हजा केली आता लोकांत मतासाठी दहशत करीत आहेत,’ असा आरोप केला. आदित्य ठाकरे यांनीही, लंके यांना आमचे शिवसैनिक अनिलभैय्यांची कमी पडू देणार नाहीत, अशी ग्वाही दिली. लंके म्हणाले, ‘नगरमध्ये व्यापारी घाबरलेत, पण हा लंके तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. 24 तास तो तुम्हाला साथ देईल. तुमची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न करतो आहे मला एकदा संधी द्या, रात्रंदिवस तुमच्या सेवेत राहील.’