प्रलंबित मागण्यांसाठी हजारो चालक रस्त्यावर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.12) सकाळी रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. न्यायासाठी जिल्ह्यातील हजारो चालक रस्त्यावर उतरले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आमच्या मागण्या पुर्ण करा अशी मागणी जोर धरत होती.
तीन चाकी, सहा आसनी मिनीडोअर वाहनांची सरसकट दोन वर्षे वयोमर्यादा वाढविण्यात यावी, चारचाकी सहा आसनी बीएस फोर मानांकीत बदली वाहनांकरीता इंधन म्हणून सीएनजीच्या वापरास मान्यता मिळावी, कोराना काळात लागू झालेले सानुग्रह अनुदान विक्रम, मिनीडोअर मॅजिक इको या मीटर टॅक्सी परवानाधारकांना मिळावे, व्यवसाय कराचा भरणा करण्यासाठी दंड व व्याज न आकारता सुट मिळावी. इको टॅक्सीला नवीन डिव्हाईस बसविण्यासाठी अतिरिक्त खर्च होत आहे. ही तांत्रिक लुट थांबविण्यात यावी. ऑनलाईन टॅक्सी परमीट बंद करावे. 15 वर्षावरील मिनीडोअर पासिंग साडेचार हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे, ती रद्द करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून मिनीडोअर चालक मालक लढा देत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चालक व मालकांनी शुुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर भगवान महावीर चौक, बालाजी नाका, मारुती नाका ते हिराकोट तलाव असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी विजयभाऊ पाटील यांच्यासह प्रमोद पाटील आदी पदाधिकारी यांनी चालक, मालकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी केली.
हजारोच्या संख्येने चालक एकवटले
आपल्या न्याय हक्कासाठी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिनीडोअर चालक व मालक यांनी मोर्चा काढला. रायगड जिल्ह्यातील हजारो चालक मागण्यांसाठी एकवटले होते. हातात झेंडा घेऊन प्रशासनाविरोधात घोषणा देत प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दप्तर दिरंगाईचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
