रोहा, उरण व माणगाव तहसिलदारांच्या देखील बदल्या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तहसिलदारपदी असलेल्या मीनल दळवी यांच्याविरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी रिक्त जागी विक्रम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रोहा, उरण व माणगाव येथील तहसिलदारांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.
10 नोव्हेंबर 2022 रोजी मीनल दळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर अलिबाग तहसिलदार पद रिक्तच होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार विशाल दौंडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. मात्र पुर्णवेळ तहसिदारांअभावी अनेक कामांचा खोळंबा झाला होता. त्याविरोधात कृषीवलने आवाज उठविला होता. त्यानुसार सदर रिक्त पदी चार महिन्यांनी नव्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर अधिकारी विक्रम पाटील यांना अलिबाग तहसीलदारपदी नियुक्ती दिली आहे. विक्रम पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.
तसेच रोहा तहसीलदार कविता जाधव यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागातील रिक्त तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नितीन देशमुख यांना रोहा तहसीलदार या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची वाडा (जि.पालघर) येथील उद्धव कदम यांच्या संभाव्य बदलीने रिक्त होणार्या जागेवर बदली केली आहे. माणगाव (जि.रायगड) येथील अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण विकास गारुडकर यांची माणगाव तहसीलदार या पदावर बदली केली आहे. येथील तहसीलदार प्रियंका कांबळे-अहिरे यांची माणगाव अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण या पदावर नियुक्ती केली आहे. कल्याण 1 येथील अपर तहसीलदार (अकृषिक) श्वेता पवार यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन या रिक्त असलेल्या तहसीलदारपदी बदली केली. वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांची शासनाने चिपळूण तहसीलदार पदी बदली झाली.