टीम इंडियाचं प्रशिक्षकपद विक्रम राठोड यांच्याकडे?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सध्या रवी शास्त्री यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद आहे. या वर्षी 17 ऑक्टोबर – 14 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत पार पडणय्रा टी-20 वर्ल्डकप पर्यंत रवी शास्त्री यांचा टीम इंडियासोबत करार आहे. मात्र रवी शास्त्री यापुढे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे टी-20 वर्ल्डकप नंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक बदलणार हे निश्‍चित आहे. सध्या विक्रम राठोड यांचे नाव प्रशिक्षकपदासाठी समोर येत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे पुढील प्रशिक्षक विक्रम राठोड असतील, अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे. अर्थात बीसीसीआयकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. विक्रम राठोड यांचे रवी शास्त्री तसेच कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा या खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. विक्रम राठोड हे सध्या टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षकही आहेत. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदासाठी त्यांचीच वर्णी लागेल, असे काहींना वाटत आहे. पण प्रत्यक्षात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

राहुल द्रविड यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात येऊ शकते अशी चर्चा रंगू लागली होती. पण राहुल द्रविड यांनी राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज भरल्यानंतर सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच जोपर्यंत विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असेल तोपर्यंत राहुल द्रविड प्रशिक्षकपद स्वीकारणार नाही, असेही काहींचे म्हणणे आहे.

टीम इंडियाच्या पुढील प्रशिक्षकाबाबतचा अंतिम निर्णय टी-20 वर्ल्डकप नंतरच होऊ शकतो. कारण त्याआधी प्रशिक्षकपदाचा निर्णय झाल्यास खेळाडूंच्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीवर फरक पडू शकतो. त्यामुळे बीसीसीआय घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही.

Exit mobile version