वाघ्रणवाडी जंगलातील गावठी हातभट्टी उध्वस्त

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दितील चेराठी, काळकाई जंगल परिसरात धाड टाकून तेथील गावठी दारूच्या चार हातभट्टी नागोठणे पोलिसांनी उध्वस्त केल्याची घटना ताजी असतांनाच नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दितील वाघ्रणवाडी पश्‍चिम व उत्तर दिशा जंगल परिसरात धाड टाकून तेथील गावठी दारूच्या दोन हातभट्टी उध्वस्त करण्याची मोहिम नागोठणे पोलिसांनी फत्ते केल्याने गावठी दारु माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांच्या पथकाने गुरूवारी ही कारवाई केली.
नागोठण्याजवळील ऐनघर, सुकेळी परिसरात गावठी दारूचे धंदे तेजीत आल्याच्या व त्यामुळे तरुण पिढी गावठी दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. असे असतांनाच वाघ्रणवाडी जंगल परिसरात गावठी दारूच्या हातभट्टी पेटवून गावठी दारु तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागोठणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत प्लास्टिकच्या 3 ड्रम मध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 600 लिटर क्षमतेचे व सुमारे रु. 24 हजार किंमतीचे गुळ मिश्रित रसायन व 2 लोखंडी टाक्यांमध्ये 400 लिटर क्षमतेचे सुमारे 16 हजार किंमतीचे असे एकूण 40 हजार रुपये किंमतीचे 1 हजार लिटर गुळ व नवसार मिश्रित रसायन सापडले. सापडलेला मुद्देमाल नागोठणे पोलिस पथकाकडून तो जागेवरच पेटवून नष्ट करण्यात आला.या पथकात चंद्रकांत पाटील,विनोद पाटील, निलेश कोंडार, रामनाथ ठाकूर, निशांत पिंगळे यांच्यासह होमगार्ड देवरे, डोबळे, भोईर, बांगरे, दरोडे, हंबीर आदींचा समावेश होता.

Exit mobile version